युरोपीय उपग्रहाच्या उड्डाणात भारत कन्येचे योगदान
उत्तर ब्राझिलमधील फ्रेंच गयाना स्पेस सेंटरमधून बुधवारी ओपीएस-सॅट या अनोख्या उपग्रहाला घेऊन सोयुझ रॉकेटने अवकाशात उड्डाण केले, तो क्षण अवकाश संशोधन क्षेत्रासाठी तर विशेष होताच पण महाराष्ट्रासाठीही तो अभिमानास्पद ठरला. कारण, युरोपीयन स्पेस एजन्सीच्या (ईएसए) या उपग्रहाचा विकास करणाऱ्या टीममध्ये वसुंधरा शिराढोणकर या महाराष्ट्रीय मुलीचा समावेश होता. वसुंधरा नांदेड येथील श्री गुरू गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगची माजी विद्यार्थिनी आहे. ईएसएच्या या उपग्रहाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रयोगांची निवड करण्यात वसुंधराने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. हा उपग्रह अवकाशातील नवीन कार्यात्मक तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्यासाठी विकसित करण्यात आला असून, हे अशा प्रकारचे जगातील पहिलेच मिशन आहे.
“रॉकेट अवकाशात झेपावताना बघणे हा खूपच सुखद अनुभव होता,” अशी भावना वसुंधराने उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर व्यक्त केली. जर्मनीतील डर्मस्टॅड येथील ईएसएच्या स्पेसक्राफ्ट ऑपरेशन्स सेंटरमधून ती बोलत होती. “प्रयोगकर्ते (एक्सपरिमेंटर्स) आणि प्रोसेसिंग प्लॅटफॉर्म यांच्यात दुवा साधणारा इंटरफेस तयार करून देणे हे माझे काम होते. शिवाय हे प्रयोग करून बघणे सुरक्षित आहे की नाही याची खातरजमा करणे हाही माझ्या कामाचा भाग होता.” हा उपग्रह ऑपरेट करणाऱ्या चार जणांच्या फ्लाइट नियंत्रण टीममध्येही वसुंधराचा समावेश आहे.
वसुंधराचे शिक्षण औरंगाबाद आणि नांदेड शहरांत झाले. त्यानंतर पुण्यातील हनीवेल या कंपनीत थोडा काळ काम केल्यानंतर ती पदव्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीला गेली. सध्या स्पेसफ्लाइट इंजिनीअर म्हणून कार्यरत असलेली वसुंधरा भारतात घालवलेल्या काळाबद्दल जिव्हाळ्याने बोलत होती. तिचे आई-वडील सध्या पुण्यात राहतात, तर नांदेडमध्येही तिचे अनेक कुटुंबीय आहेत.
नांदेडमधील श्री गुरू गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगमधून वसुंधराने २००८ मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन शाखेत बी.टेक. ही पदवी संपादन केली. एसजीजीएसचे संचालक यशवंत जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वसुंधराने प्राप्त केलेल्या यशाबद्दल आनंद व अभिमान व्यक्त केला. “वसुंधरा कॉलेजमध्ये असताना खूपच बुद्धिमान आणि उत्साही विद्यार्थिनी होती. ती नवीन काही शिकण्यासाठी कायम तयार असायची. विद्यार्थ्यांच्या अनेक उपक्रमांमध्येही तिचा सक्रिय सहभाग होता. आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटावा अशी कामगिरी तिने केली आहे.”
या उपग्रहाच्या विकासाशी आपला संंबंध कसा आला हे वसुंधराने स्पष्ट करून सांगितले. ती सध्या जर्मनीतील डर्मस्टॅड येथे मुख्यालय असलेल्या टर्मा जीएमबीएच या कंपनीसाठी एक्स्परिमेंट इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनीअर म्हणून काम करत आहे. या कंपनीचा युरोपीयन स्पेस एजन्सीशी करार झालेला आहे. त्यामुळे वसुंधराला ईएसएच्या ओपीएस-सॅट प्रकल्पासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. मिशनचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक क्षमतांमध्ये आमूलाग्र स्वरूपाची सुधारणा कशी झाली आहे याचे प्रात्यक्षिक देण्यासाठी हा उपग्रह विशेषत्वाने विकसित करण्यात आला आहे. उपग्रह अधिक शक्तिशाली ऑनबोर्ड कम्प्युटर्ससह अवकाशात झेपावतील तेव्हा या क्षमतांची आवश्यकता खऱ्या अर्थाने भासणार आहे. नवोन्मेषकारी (इनोव्हेटिव) नियंत्रण सॉफ्टवेअर्सची चाचणी घेणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
ओपीएस-सॅट हा उपग्रह आकारमानाने अत्यंत छोटा आहे. याची उंची केवळ ३० सेंटीमीटर आहे. मात्र, जगातील सर्वांत शक्तिशाली इनफ्लाइट कम्प्युटर्स यामध्ये बसवलेले आहेत. ओपीएस-सॅटमधील ऑनबोर्ड सॉफ्टवेअरची ट्रायल घेण्यासाठी कोणीही अर्ज करू शकते. या क्षेत्रातील कंपन्या आणि संशोधकांपासून ते निव्वळ छंद म्हणून हे करू इच्छिणारेही इंटरनेटवरून थेट लिंकवर जाऊन अर्ज करू शकतात.
या यशाचे श्रेय वसुंधराने पती अमित श्रीवास्तव, आई-वडील, सासू-सासरे व अन्य कुटुंबियांना तसेच एसजीजीएस कॉलेज आणि मित्रपरिवाराला दिले आहे. सर्व कुटुंबियांचा पाठिंबा होता म्हणूनच आपण दोन वर्षांच्या छोट्या मुलीला सांभाळून हे काम एकाग्रतेने करू शकलो, असे तिने आवर्जून नमूद केले.