एसजीजीएस अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतर्फे स्टार्टअप व उद्योजकता विकासासाठी ‘नेक्स्ट बिलियन डॉलर ड्रीम’ विषयावरती ऑनलाइन वेबिनार
श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था नांदेड यांच्यातर्फे ‘नेक्स्ट बिलियन डॉलर ड्रीम‘ या स्टार्टअप व उद्योजकता विकास विषयावरती ऑनलाईन वेबिनार आयोजित दिनांक १४ जून २०२० रोजी आयोजित करण्यात आला. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून हैद्राबादचे प्रसिद्ध उद्योजक तसेच जॅकमार्ट व रियसायकल कंपन्यांचे संस्थापकीय चेअरमन श्री अभय देशपांडे हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते. त्यांनी आपल्या एक तासाच्या सेमिनारमध्ये विद्यार्थी व नवीन उद्योजकांना उद्योगात यशस्वी होण्यासाठी गुरुकिल्ली दिली. ते म्हणाले, ‘उद्योजकतेचे स्वप्न पहा, नियोजन करा आणि लहान बाळाचं संगोपन जसं करत असतात तसे उद्योगाची काळजी घेत वाटचाल करा. स्टार्टअप, उद्योगात यशस्वी होण्यासाठी एक मजबूत विश्वासू टीमची आवश्यकता असते. ज्यामध्ये एकमेकांवर विश्वास, मोठे होण्याची स्वप्न आणि सकारात्मक ऊर्जा असली पाहिजे जेणेकरून ही टीम उद्योगाच्या चढ-उताराच्या काळात ती नेहमीच आपल्या सोबत राहील. आज जगामध्ये अनेक गुंतवणूकदार पैसा गुंतवायला तयार आहेत. त्यामुळे भांडवल हे उद्योगाचा अडथळा राहिलाच नाही. फक्त उद्योगासाठी योग्य आयडिया, योग्य वेळ आणि योग्य ठिकाण हे योग्य टीमसोबत तुम्ही गुंतवणूकदाराकडे घेऊन पोहचले पाहिजे. उद्योगांमध्ये चढ-उतार येणारच, अनेक वेळेस तुम्हाला रिजेक्ट केल्या जाईल. हसत हसत स्वीकारा आणि पुढे चालत रहा, नक्कीच यशस्वी सोनेरी पहाट लवकरच उघडेल.”
श्री अभय देशपांडे हे एसजीजीएसचे आयकॉन व १९९४ बॅचचे संगणक विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. हा वेबिनार ‘एसजीजीएस आयकॉन्स‘ या उपक्रमातून आयोजित करण्यात आला. यात विशेष नोंद करण्याजोगी बाब म्हणजे ह्या ऑनलाइन वेबिनार मध्ये माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाचा उपयुक्त व परिणामकारक वापर करण्यात आला. वेबीनारचे संयोजक डॉ. रवींद्र जोशी यांनी प्रस्ताविक मांडले. या वेबिनारमध्ये एकूण १२५ माजी विद्यार्थी, प्राध्यापक, उद्योजक व माजी विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी, जालन्याचे उद्योजक व एसजीजीएसचे माजी चेअरमन श्री सुनील रायथताजी, आयबीएमचे मॅनेजर श्री दिलीप छत्रे, पुण्याचे उद्योजक श्री नितीन बांदेकर, नाशिकचे उद्योजक श्री राजेश पुसदकर, मुंबईचे श्री रवींद्र शानभाग, रिलायन्सचे सिनियर मॅनेजर श्री गोकुळ पवार, भिवंडीचे उद्योजक श्री अरविंद पहुरकर, टीसीएसचे कन्सल्टंट श्री सतीश कुलकर्णी, डॉ. आर एस होळंबे, डॉ. सुहास गाजरे, डॉ. मनीष कोकरे अशे भारतातील अनेक ठिकाणाहून लुधियाना, जालना, पुणे, हैदराबाद, नांदेड अशा १२५ जणांनी गूगल मीट या ॲपद्वारे ऑनलाइन वेबिनारला उपस्थिती दिली.
डॉ. रवींद्र जोशी यांनी ‘एसजीजीएस आयकॉन्स‘ या पुस्तकाचे लिखाण केले असून त्यात तीस यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आहेत आणि ते पुस्तक नुकतेच प्रकाशित होणार आहे. यात प्रसिद्ध उद्योजक, महाराष्ट्र शासन व केंद्राच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी, संगीतकार, समाजसेवक, शास्त्रज्ञ अशा अनेक क्षेत्रातील ३० माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आहेत. हे पुस्तक इंजिनीअरिंगचे व इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि नुकतेच पुस्तक प्रकाशित होणार आहे.